भाटशिरगांव हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील प्रगतीपथावर असलेले एक अत्यंत उपक्रमशील, नाविन्याचा ध्यास असलेले समृद्ध व कृषीसंपन्न गाव आहे. भाटशिरगांव हे गाव तालुका मुख्यालय शिराळा (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे ०८ किमी आणि जिल्हा मुख्यालय सांगलीपासून सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे.
भाटशिरगांवमधील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून, शेतकरी ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, शाळू, कडधान्ये, झेंडू, भाजीपाला अशी अनेक पीके घेतात. शिवाय पशुपालन, कुक्कुटपालन हे जोडधंदे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्रदान करत आहेत. गावातील अनेक तरुण नोकरीच्या संधींच्या शोधात मुंबई- पुण्यात स्थायिक झाले असले तरी, सर्वांची गावाशी आणि इथल्या मातीशी असलेली नाळ अतूट आहे. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात. भाटशिरगांव ग्रामपंचायत गावाच्या तसेच गावाअंतर्गत येणारी रेके वस्ती, कुरणे वस्ती, धुमाळवाडी, भाऊशीद वस्ती, सटालेवाडी आदी वाडी वस्त्यांवर पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सोयी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता अशा विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची सेवा देणे आणि गावाचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधणे हा आहे.
खालील विभागांमध्ये तुम्हाला भाटशिरगांवबाबत संख्यात्मक माहिती मिळेल: लोकसंख्या, साक्षरता, घरसंख्या, मुलांची संख्या, जातीची माहिती, क्षेत्रफळ, पिनकोड, स्थानिक प्रशासन, शेजारील गावे, कनेक्टिव्हिटी आणि इतर महत्त्वाची माहिती.