भाटशिरगांवातील सुमारे ८०० वर्षे जुने महादेव मंदिर

भाटशिरगांवातील ‘महादेव मंदिर’ हे एक पंचक्रोशीतील ऐतिहासिक मंदिर असल्याने, त्यासोबत अख्यायिका जोडल्या जाणे साहजिकच आहे. उदाहरणार्थ- ‘हे मंदिर पांडवांनी बांधले, एका रात्रीत बांधले व सूर्य उगवायला लागल्यामुळे काम अर्धवट सोडून शिल्पकार निघून गेले’, वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या या मंदिराच्या बाबतीत अशा दंतकथा रचल्या जाणे, हे अत्यंत धार्मिक अशा भारतीय संस्कृतीत नवलाईचे नाही. मात्र दंतकथा आणि वस्तुस्थिती यातील तफावतीचा कधीतरी आपण तार्किकपणे विचार करायला हवा. जनसामान्यांचे अज्ञान दूर करणे, आजूबाजूच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अशा वास्तूंबाबत त्यांना सजग व साक्षर करणे महत्त्वाचे असते. कारण अशा बहुमुल्य ठेव्यांचे संवर्धन करण्यात लोकप्रबोधन हीच पहिली पायरी असते. म्हणून भाटशिरगांवचे सुपुत्र असलेले इतिहास अभ्यासक कैलास देसाई यांनी गावातील जुने- जाणते, ज्येष्ठ नागरिक व सर्व युवामित्रांच्या साथीने ‘ऐतिहासिक महादेव मंदिर संशोधनाचे’ काम हाती घेतले.

सर्वप्रथम मंदिराच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण भागाची, जसे की- प्रवेशद्वार, मंडप, खांब, अंतराळ (vestibule), गर्भगृह, छताच्या आतील बाजूस असणारे दोन घुमट व मंदिरातील विविध मुर्त्या यांचे चांगल्या दर्जाचे ५० ते ६० फोटो काढून, साॅफ्ट काॅपीज काही पुरातत्वशाखेतील नामांकित तज्ञ संशोधकांना पाठविल्या. त्यांनी दिलेली निरीक्षणे आपल्या पुढे ठेवत आहे. लोकजागृती तसेच मंदिर संवर्धनाच्या दृष्टीने ही निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत.

प्रा. डॉ. माधवी महाके (इतिहास संशोधक व मंदिर स्थापत्य अभ्यासक, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय ,उदगीर; जिल्हा- लातूर) मंदिराचे पाठविलेले फोटो आणि माहितीच्या आधारे पुढील निरीक्षणे नोंदवितात-
१) आपल्या गावातील पूर्वाभिमुख असलेले महादेव मंदिर हे १४ वे ते १५ वे शतक या दरम्यानचे असावे आणि स्थपती म्हणजे मंदिर उभारणारेही स्थानिक असावेत.
२) मंदिरांची गर्भगृह, अंतराळ, सभामंडप अशी रचना आहे. मंडप ‘गूढ मंडप’ या प्रकारातील आहे. तर मंदिराचे शिखर हे अलिकडच्या काळातील आहे.
३) मंदिरांचा बाह्य भाग हा सपाट व शिल्प विरहित आहे. बाह्य भागाच्या मुळ रुपात, जीर्णोद्धार वेळी बराच बदल केला आहे असे वाटते. मंदिराबाहेर पश्चिमाभिमुखी नंदी आहे.
४) अंतर्गत भागातील द्वारशाखा, चौरसाकृती आणि मध्यभागी कमल पुष्प असलेले वितान, स्तंभही आहेत. विशेष म्हणजे स्तंभ दोन प्रकारचे दिसतात. अंतराळा समोरील गर्भगृहात प्रवेश करताना चे दोन स्तंभ आणि सभामंडपतील स्तंभ वेगळे आहेत.
५) मंदिरात शिलालेख नसल्याने काळ, राजवट याची स्पष्ट माहिती मिळत नाही. कदाचित मंदिराचा जीर्णोद्धार करतेवेळी, त्यात शिलालेख गेला असण्याची शक्यता आहे.
६) मंदिरात गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गणेश आहे. गर्भगृहात शिवलिंग आणि गर्भगृहातच लहान पीठावर ‘विष्णूचे’ शिल्प आहे. ते विष्णु चे ‘उपेंद्र अथवा त्रिविक्रम’ रूप असावे, आयुधे भग्न असल्याने दोघांपैकी नेमके कोण? निश्चित करता येत नाही.
७) सभामंडपात ‘सप्तमातृकापट’ आणि पूजक/ भक्त व्यक्तींची नमस्कार मुद्रेतील आसनस्थ दोन वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत. विशेष म्हणजे त्यांचे अलंकरण, केशरचना अत्यंत रेखीव व वैशिष्ट्यपुर्ण आहे. या दोन्हीही शिल्पातील व्यक्ती सुखासनात आहेत. त्याचप्रमाणे सभामंडपात दोन देवकोष्ठ आहेत. पैकी दक्षिणेकडील देवकोष्ठ भग्न असून, उत्तरेकडील देवकोष्ठात नमस्कार मुद्रा व सुखासनात बसलेली एक पूजक/ साधू व्यक्ती दिसते. या पूजक/ भक्त व्यक्ती कदाचित गावातीलच सरदार/ वतनदार/ उच्चपदस्थ असू शकतील, कारण मंदिराच्या आवारात असलेल्या वीरगळ शिल्पांमधून गावातील सरदार/ वतनदारांचा इतिहास पुढे येत असल्याचे दिसते.
८) ज्येष्ठ गावक-यांनी दिलेल्या माहिती नुसार, मंदिराची नोंद ब्रिटिश काळात घेतली होती व काही देणगी आर्थिक स्वरूपात भेटत होती. म्हणजे जुन्या दफ्तरात या बाबत काही माहिती मिळेल, असा कयास आहे.
९) या मंदिराच्या जतन व संवर्धना बाबत गावकरी आणि पुरातत्व खाते संयुक्तपणे प्रयत्न करू शकतात. मात्र अज्ञानापोटी मंदिरास अथवा कोणत्याही भागास रंगरंगोटी केली, तर याचे मुळ स्वरूप नष्ट होईल. याचा गांभीर्याने विचार करून शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञ श्री. गोपाळ जोग (Assistant Professor in Indian Art, Department of AIHC and Archeology, Deccan College, PGRI, Pune-06) यांच्या मतानुसार,

१) गर्भगृहातील महादेवाच्या पिंडीशेजारी, भिंतीलगत पूर्वेकडे ‘विष्णूची’ प्रतिमा आहे. साधारणतः १३ व्या ते १४ व्या शतकाच्या प्रारंभीक काळातील असावी.
२) प्रस्तूत मंदिर बरेच अलीकडचे असून स्तंभ, द्वाराची रचना, बाह्यभाग व इतर गोष्टी हे दर्शवितात की हे मंदिर साधारणतः १५ व्या ते १६ व्या शतकात बांधले असावे. मंदिराचे स्थापत्य -हास काळातील आहे.
३) सोबतच अशीही शक्यता आहे की, याच ठिकाणी असलेल्या जून्या मंदिराच्या अवशेषांचा पुनर्वापर करून, वर निर्देश केलेल्या काळात जीर्णोद्धार केला गेला असावा.
४) लिखीत पुराव्याच्या अभावी राजवट सांगणे अवघड आहे. तत्कालीन या भागात असलेल्या लोकांनी मंदिर उभारले असावे.
५) या मंदिरातील साधूंच्या प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अशा प्रतिमा सांगली, सातारा या परिसरात आढळतात.

वरील पुरातत्वशास्त्रज्ञांची महत्त्वपूर्ण निरीक्षणे, मंदिराच्या आवारातील वीरगळांचे अस्तित्व व इतर संशोधकांशी केलेल्या समग्र चर्चेअंती आपण या निष्कर्षाप्रत येतो की,

१) ज्याअर्थी मंदिराच्या गर्भगृहातील ‘विष्णू मुर्ती’ सुमारे ८०० ते ९०० वर्षे जुनी आहे व पूजक/ भक्तांच्या सुबक मूर्तीही पुरातन वाटतात, त्याअर्थी सदरच्या महादेव मंदिराच्या जागी पूर्वी एखादे पुरातन महादेव मंदिर असावे. याच मंदिरातील जुन्या मुर्तींचा वापर करून, स्थानिक लोकांनीच मंदिराचा संपूर्ण जिर्णोद्धार साधारणतः ६०० ते ७०० वर्षांपूर्वी म्हणजे उत्तर यादवकाळात केला असावा.
२) मंदिराचे गर्भगृह आणि अंतराळ आधी बांधले असावे व नंतर काही वर्षांनी सभामंडपाची उभारणी केली असावी. कारण, अंतराळ व सभामंडपातील खांबांच्या शैलीत फरक आहे.
३) महादेव मंदिर, पूजक/ भक्तांच्या ३ मूर्ती व मंदिराच्या आवारातील वीरगळींवर चितारलेल्या शिवपिंडी, तत्कालीन या भागावर असलेला शैवपंथाचा प्रभाव दर्शवितात.
४) नमस्कार मुद्रेत व सुखासनातील ३ पूजक/ भक्तांच्या मूर्ती, त्या व्यक्तींचा पेहराव, त्यांनी परिधान केलेले अलंकार यावरून लक्षात येते की मंदिरास गावातील उच्चपदस्थ/ सरदार/वतनदारांचा राजाश्रय होता. तसेच ते महादेवाची निस्सीम भक्ती करत होते.
५) मंदिराच्या गर्भगृहावरील कळस गेल्या २५- ३० वर्षांपूर्वीचा असून, मुळ मंदिराचे छत सपाट असावे. तसेच नंतरच्या काळात सिमेंटने केलेली डागडुजी व फ्लोअर काँक्रिटीकरण यामध्ये शिलालेख गाडला गेला असावा.

सदरच्या संशोधनकार्यात पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. डाॅ. माधवी महाके, प्रा. गोपाळ जोग यांनी अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदविली. तसेच हे काम पूर्णत्वास जाण्यात इतिहास संशोधक डाॅ. श्रीमंत कोकाटे सर, इतिहासाचे अभ्यासक व वीरगळ संशोधक श्री. अनिल दुधाणे सर, इतिहास व पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक श्री. सचिन पाटील सर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. महादेव मंदिर इतिहास संशोधनाच्या निमित्ताने भाटशिरगांवचा तसेच इथल्या स्थापत्य कौशल्याचा अभिमानास्पद इतिहास समोर येण्यास मदत झाली आहे.