भाटशिरगांव मध्ये सुमारे ८०० वर्षांचे दुर्मिळ वीरगळ

वीरगळ म्हणजे काय? तर सोप्या शब्दांत ‘स्मारकशिळा’ (Herostone). समर प्रसंगात अथवा युद्धात धारातिर्थी पडलेल्या योद्ध्याचे, वीराचे व त्याच्या रणांगणातील शौर्याचे पुढील पिढीस स्मरण राहावे म्हणून उभारलेली सचित्र, शिल्पांकित शिळा म्हणजे वीरगळ. असे वीरगळ कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. कर्नाटकात त्यांस ‘वीरकल्लू’ असे म्हटले जाते. (कल्लू म्हणजे दगड).

मराठीत हाच शब्द वीरगळ असा प्रचलित झाला असावा. हे वीरगळ बहुधा आयताकृती (काही वेळ त्रिकोणीसुद्धा!) ३- ४ फूट उंचीच्या शिळा असतात. त्या शिळेवर तीन- चार कप्पे केलेले असतात. प्रत्येक कप्प्यात धारातीर्थी पडलेल्या योद्ध्याचे काही प्रसंग कोरलेले असतात. जसे की खालच्या कप्प्यात योद्ध्याचा पवित्रा, मधल्या कप्प्यात लढाईचा प्रसंग, तिस-या कप्प्यात धारातीर्थी योद्ध्यास नेण्यास आलेल्या स्वर्गीय अप्सरा आणि शेवटच्या कप्प्यात महादेवाची पिंड म्हणजे योद्ध्यास मोक्षप्राप्ती! रणांगणात धारातीर्थी पडणा-या शूरवीरास स्वर्ग व मोक्षप्राप्ती होते ही अतिशय पूर्वापार चालत आलेली धर्मश्रद्ध लोकभावनाच या वीरगळांच्या उभारणीतून ठळकपणे दिसून येते.

भाटशिरगांव मधील वीरगळांचे गावचे सुपुत्र इतिहास अभ्यासक कैलास देसाई यांनी युवकांच्या सहकार्याने पुढाकार घेत संशोधन करण्यासाठी वीरगळ अभ्यासक श्री. अनिल दुधाणे यांना संपर्क केला. श्री. दुधाणे यांनी गावातील वीरगळांचा अभ्यास करून गावाच्या दृष्टीने दिलेले काही महत्त्वाचे प्राथमिक निष्कर्ष खालीलप्रमाणे:

१) श्री. दुधाणे सरांच्या अभ्यासावरून सदरचे वीरगळ शिलाहार (इ.स.८०० ते १०००) अथवा यादवकालीन ( इ.स. ८६० ते १३१७) असावेत. म्हणजे वीरगळ १२ व्या शतकातील असावेत व त्यांचे साधारण, सरासरी आयुर्मान आठशे ते नऊशे वर्षे असावे. याचा अर्थ असा की त्यापूर्वीच आपले भाटशिरगांव वसले होते.
२) भाटशिरगांवच्या गावपांढरीस हजारो वर्षांचा, समरप्रसंगाचा, रणमैदान गाजविणा-या व मातीच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणाहूती देणा-या शूरवीरांचा, पराक्रमी योद्ध्यांचा इतिहास आहे.
३) एका वीरगळावर रेखाटलेली मोठी हत्तीदळाची लढाई महत्त्वाची आहे. असे वीरगळ दुर्मिळ असतात. या वीरगळामध्ये हत्तीवर स्वार झालेला सेनानी राजा अथवा सेनापती/ प्रधान असावा कारण हत्तीवर स्वार होणाराही तेवढा प्रमुख/ मातब्बर असतो. या हत्तीवर स्वार झालेल्या वीराकडून समोर लढणा-या आपल्या गावातील योद्ध्याचा मृत्यू झाला आहे. आता अशा प्रमुख राजा अथवा सेनानी विरूद्ध मामुली शिपाई न लढता समोर लढणाराही शत्रुपक्षातील प्रमुख सेनानी/ सरदार/ वतनदार असू शकतो. म्हणजेच आपल्या गावास प्रमुख हुद्देदार सेनानी/ सरदार/ वतनदारांचाही शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
४) बाकीच्या वीरगळांवर रेखाटलेली पायदळ व घोडदळांची लढाई तत्कालीन गावातील योद्ध्यांचे विविध क्षेत्रांतील युद्धनैपुण्य दर्शविते.
५) वीरगळांवर रेखाटलेले शिवलिंग त्या काळातील शैव-पंथाचा प्रभाव दर्शविते.

वीरगळ हा एक निर्जीव दगड भासला तरी त्या दगडास स्वत:चा शेकडो वर्षांचा जिताजागता इतिहास आहे. युद्धभूमीवर, घनघोर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते असल्या वीरगळांमुळेच लोकांच्या स्मरणात राहिले.