भाटशिरगांवचे ग्रामदैवत श्री जोतिबा

भाटशिरगांवच्या मध्यभागी ग्रामदैवत श्री जोतिबा मंदिर आहे. मंदिराचे आकर्षक आणि सुबक बांधकाम जवळपास २० वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून करण्यात आले असून मंदिरास मोठा सभामंडप आहे. हा सभामंडप सार्वजनिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांसाठी वापरला जातो. ग्रामदैवत जोतिबा मंदिराचे पारंपरिक पुजारी म्हणून गुरव बंधू देवाची नित्य पूजा पार पाडतात. दर रविवारी सायंकाळी जोतिबाच्या आरतीसाठी गावातील भाविक व ग्रामस्थ एकत्र येतात. दरवर्षी वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा झाल्यानंतर, पुढच्या रविवारी (साधारण एप्रिल महिन्यात) भाटशिरगांव येथे जोतिबाची यात्रा भरते. यात्रेनिमित्त माहेरवाशिणी, मुंबई- पुण्याला कामानिमित्त स्थलांतरित झालेले तरुण कुटूंबीयांसोबत यात्रेला येतात. श्री जोतिबा यात्रेवेळी परंपरागत मार्गाने पालखी सोहळा, सासनकाठी, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सर्व गावकरी, बारा बलुतेदार अठरापगड जातींचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहात, एकोपा आणि भक्तिभावाने सामील होतात.